चांदवडची रेणुका माता हे महाराष्ट्रातील ५२ शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. हे मंदिर डोंगरावर वसलेले असून निसर्गरम्य आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. देवीची मूर्ती स्वयंभू असून दिवसातून तीन वेळा तिचे रूप बदलत असल्याचे मानले जाते. नवरात्रीमध्ये येथे मोठी यात्रा भरते.
हे अतिशय पुरातन शिव मंदिर असून त्याची स्थापना राजा चंद्रसेन यांनी सुमारे २१०० वर्षांपूर्वी केली असे मानले जाते. राजा विक्रमादित्य आणि चंद्रकला यांच्या विवाह सोहळ्याशी हे मंदिर जोडलेले आहे. श्रावण महिन्यात येथे भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिर परिसरातील शिल्पकला आणि नंदीचे शिल्प प्रेक्षणीय आहे.
चांदवड शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ८ व्या शतकात यादव वंशाचे संस्थापक राजा दृढप्रहार यांनी या शहराची स्थापना केली असे इतिहास सांगतो. होळकर राजवटीत चांदवडचे महत्त्व वाढले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला रंगमहाल (Rangmahal) आणि बारव (Water tanks) आजही शहराच्या वैभवाची साक्ष देतात. मुंबई-आग्रा महामार्गावरील हे शहर व्यापाराचे मुख्य केंद्र होते.